मला प्राजक्ताबरोबर बोलायला कधीपासून आवडायला लागला तर आई बाबांनी जेंव्हा पुण्यात फ्लॅट घेतला तेंव्हापासून. मोठा प्राजक्त होता तो. खोड नेहमीच्या पाहण्यातला प्राजक्ताच्या झाडांपेक्षा बरंच जाड. खूप फुलं पडायची. रोज संध्याकाळ सुरू झाली म्हणजे पावणे सहाच्या ठोक्याला पावसाळ्यात, थंडीत आणि पावणे सातला उन्हाळ्यात तो कळ्यांनी डवरलेला असायचा. इतकं बहरुन येणं कस जमायचं त्याला मला खूप अप्रूप वाटायचं. मला आनंद व्हायचा त्याला असा बघून. पहाटे पर्यंत फुलं बरसत रहायचा.
मी गरोदर होते तेंव्हा असच एकदा बघत होते त्याला. पण एकदम चमत्कार झाला. मला त्याच्या आजूबाजूला कसलातरी गुंता आहे असा वाटलं. आणि काय जादू त्या झाडावर प्रत्येक उमलत्या कळीगणिक मधमाश्या होत्या. कितीतरी. त्यांच्या जवळ नाही जाऊ शकले मी खिडकीत असल्यामुळे पण कोण गुंजारव चालू असेल त्यांचा. मला ऐकू येत नव्हता त्यांच्या पंखांचा नाद पण मला जाणवत होता कसा असेल.
इतक्या माश्या बघून घर तर आपण घाबरतो. पण त्या गुंग होत्या, शांत होत्या, त्यांना कुणालाही चावायला जायचं नव्हतं. वेळच नव्हता त्यांना जणू आजूबाबाजूला बघायला. त्यांना फक्त प्राजक्त खुणावत होता. त्याची उमलणारी प्रत्येक कळी गाठायची होती त्या मधमाशांना. एकीने अजून त्या उमलत्या कळीतले रसप्राशन करेतोवर दुसरी तिसरी अगदी चौथी सुद्धा हजर होती वाट पाहत. तोवर त्यांचा अखंड नाच चालू होता बाहेर.
मी फक्त बघत होते आणि त्याचा कौतुक करणं सुध्दा विसरून गेले मी. ती फक्त एक जाणीव होती. अनुभव होता निसर्गाचा कि कुणा गूढ शक्तीचा जी सतत रमलेली होती सर्जनात मला मात्र ते आत्ता जाणवलं.
खरं तर चित्रात उतरवायचा होता हे सगळं मला. पण माझ्या जाणिवा खूप खुज्या होत्या त्यांच्या समोर. अजून मला नाही जमलं रंगवायला. जाणिवेच्या गाभाऱ्यात जागा मिळवली होती त्यांनी. त्या उमलणाऱ्या कळ्यांनी, त्यांच्या धुंद करणाऱ्या सुवासासहित. ते निसर्गनाट्य मी किती तरी वेळ पाहत होते. आणि तेंव्हा पासून रोज ते अनुभवायची आस लागली होती. ध्यानस्थ होऊन जायचे मी त्या क्षणांनीं. तो आविष्कार कदाचित माझ्यासाठीच होता असं रोज वाटायचं. त्या शेकडो मधमाश्या गंधाळलेल्या प्राजक्तफुलांवर रुंजी घालताना पाहणं आणि त्या सुवासाने मन प्रसन्न होऊन देवाचे रोज आभार मानणं हा नेम झाला होता. फक्त एक खंत होती, आधी कशा नाही दिसल्या या मधमाश्या, ही बेधुंद होऊन फुलणारी फुलं.
मला बाळ झाल्यावर रोज रात्री या प्राजक्ताशेजारी थांबून बाळाला जोजवायच आणि मग आम्हा दोघांनाही शांत झोप लागत असे. मला एकदा त्यानेच दिली सुचवली हि अंगाई..
प्राजक्त उभा अंगणी,
पाहुनी बाळ सुगुणी,
द्यावया त्यास आंदण,
करी प्रात:समयी पखरण.
पाहुनी शुभ्रकेशरी
विखुरले रंग अंगणी
बाळ हा ऋणी,
ऋणी माउली.
याच प्राजक्ताला खूप विनवणी केली होती मी . तुझ्या प्रत्येक कळीसारखा फुलून येऊन दे त्याच्या (माझ्या ताईच्या नवऱ्याच्या) फुफ्फुसात ऑक्सिजन. तो इतका बहरला होता कि मला समजत नव्हतं का. स्वामींच्या मनातही कदाचित होतं त्याचं जाणं. बाळूमानाने तर सगळं समजावून सांगितलं त्याच वेळेला टेलिव्हिजनवर. प्राजक्त फुलत असताना. मला समजतच नव्हतं कुणाला सांगू कुणाचं ऐकू. आणि कसं समजून घेऊ.
या प्राजक्ताला वाळवी लागलेली पाहून खूप घाबरले होते मी त्याला मीठ घातला का औषध घातला का बघत होते मी. मी नव्हतं घातलं औषध किंवा मीठ, विचारलं होतं. प्रार्थना केली होती मनापासून त्यांना वठून जाऊन नये आणि पुन्हा नव्याने फुलावं अशी. त्याचं पुन्हा असं हे बहरण अशा वेळी माझ्या जाणिवेच्या पलीकडचं होतं. तू फुलून आलास तस त्यांनही परत यावं अशी प्रार्थना करत होते मी. फक्त प्रार्थना.
अजूनही बोलते मी त्याच्याशी. आता काय उरलं आहे. काय दाखवणार आहे असं विचारत. आता मात्र जोडीला निंब, अशोकही आहेत. फणसान तर ठरवलं आहे आमच्या खिडकीतच येऊन बोलायच इतका वाढला आहे तो ४ वर्षात.
---प्रांजली दीक्षित